21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home महाराष्ट्र निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, भाजप आक्रमक !

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, भाजप आक्रमक !

महाराष्ट्रात राज्य पुरस्कृत दहशतवाद सुरू असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१२ (प्रतिनिधी) अभिनेत्री कंगना रनौतचे प्रकरण शांत होत नाही तोवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे वादग्रस्त व्यंगचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट करणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यास शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण उचलून धरले असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यापासून राज्यातील भाजप नेत्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर महाराष्ट्रात राज्यसरकार पुरस्कृत दहशतवाद सुरू असल्याचा आरोप केला. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, माजी सैन्य अधिकाऱ्यांवर हल्ला होणे खेदजनक बाब असून हे अजिबात सहन केले जाणार नाही, अशी कडक समज दिली आहे.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे एक वादग्रस्त व्यंगचित्र व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मदन शर्मा यांच्या कांदिवली येथील घरी घुसून त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख कमलेश कदम ५ शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांची काही तासातच जामिनावर सुटका झाल्याने स्थानिक भाजपा आमदार अतुल भातखळकर, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आरोपींवर योग्य कलमे लावून कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

भाजप आक्रमक !
माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना हा राज्यपुरस्कृत दहशत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. आऊन कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर अशा प्रकारे गोष्टी होत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झालं नव्हतं, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही फोनवरुन मदन शर्मा यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैन्य अधिकाऱ्यांवर हल्ला होणे, खेदजनक बाब असून हे अजिबात मान्य नाही असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी !
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाणप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समस्त जवानांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. पोलिसांनी किरकोळ जामीनपात्र कलम लावून काल रात्रीच सर्व आरोपींना सोडून दिले. निवृत्त सैनिकाला शिवसेनेच्या गुंडाकडून ज्या प्रकारे मारहाण होणे ही शरमेची बाब आहे. सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना मारहाण केली जात आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांच्या विरोधात सुडाचे राजकारण करण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली असल्याची टीका भातखळकर यांनी केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरसकट नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या