मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व त्यासोबतच समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणी तब्बल २९ दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर सायंकाळी तिची भायखळा तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे महिनाभरानंतर ती तुरुंगाबाहेर पडली आहे.
रिया चक्रवर्तीला आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करून ६ महिने विशिष्ट तारखांना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला आहे. रियासोबत आरोपी दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा यांचा जामीन अर्जही मंजूर करण्यात आला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज रियाच्या अर्जावर सुनावणी झाली. हमीदारांची त्वरित व्यवस्था होऊ शकणार नसल्याने सध्या रोखीच्या जामिनावर सुटका होण्याची मुभा द्यावी, अशी विनंती रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी केली.
त्याप्रमाणे न्यायमूर्तींनी तशी मुभा देऊन १ लाख रुपयांच्या रोख जामिनावर जामीन मंजूर केला. एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या आदेशाविरोधात अपिल करता यावे, यासाठी एक आठवड्याची स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र, रियाला जामीन मंजूर करताना आधीच अनेक कठोर अटी लावलेल्या आहेत. त्यामुळे न्यायमूर्तींनी ही विनंती मान्य केली नाही. रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यामुळे महिनाभरानंतर ती तुरुंगातून बाहेर पडली.
पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
रिया चक्रवर्ती आणि दीपेश सावंत यांना आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, सावंतची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आणि तपास अधिका-यांसमोर प्रत्येक सोमवारी हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय परवानगीशिवाय कुठेही प्रवास करता येणार नाही, असेही म्हटले आहे.
पुढील ६ महिने पोलिसांत हजेरी लावण्याचे आदेश
रियाने जवळच्या पोलिस ठाण्यात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या कालावधीत नियमितपणे १० दिवस हजेरी लावावी. तसेच, पुढील ६ महिने विशिष्ट तारखांना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.
कृषी धोरणास स्थगिती; राज्य शासनाच्या आदेशाची भाजपाकडून होळी