27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआता रिक्षा, टॅक्सी भाडे वाढणार?

आता रिक्षा, टॅक्सी भाडे वाढणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : सीएनजी गॅसच्या दरात होत असलेल्या वाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. सीएनजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्याशिवाय महागाईतही वाढ झाल्याने टॅक्सी संघटनांनी प्रवास भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत पुढील आठवड्यात रिक्षा, टॅक्सी संघटना आणि परिवहन विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत दरवाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोरोना लॉकडाउन शिथील करण्यात आल्यानंतर दरवाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी रिक्षा, टॅक्सी संघटनांनी आग्रही मागणी केली नव्हती. तरीदेखील ही दरवाढ झाली होती. मागील काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर ८० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत आहे. त्याशिवाय वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक गणित जमवणे रिक्षा-टॅक्सी चालकांना कठीण होत आहे.

किती दर वाढणार?
टॅक्सी चालक संघटनेने राज्य परिवहन विभागाकडे ५ रुपये दरवाढीची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीच्या प्रवास भाड्याचा पहिला टप्पा २५ रुपये आहे. हा टप्पा ३० रुपये करण्याची मागणी टॅक्सी चालक संघटनांनी केली आहे, तर परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दराच्या टप्प्यात ४ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षाच्या दरातही तीन ते चार रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या