27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रअपक्ष, छोट्या पक्षांच्या पाठिंब्यासाठी रस्सीखेच

अपक्ष, छोट्या पक्षांच्या पाठिंब्यासाठी रस्सीखेच

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार उभा आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या आमदारांची मते फार महत्वाची आहेत. त्यामुळे ही मते मिळविण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आहे. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सहाव्या जागेसाठी छोटी पक्ष आणि अपक्ष मिळून असलेली एकूण २९ मते निर्णायक ठरणार आहेत.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतांच्या संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार आणि भाजपचे २ उमेदवार निवडून येऊ शकतात, हे स्पष्ट आहे. पण ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून दुसरा आणि भाजपकडून तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवण्यात आला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांकडेही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची २९ मते यामध्ये निर्णायक ठरणार आहेत. यात अपक्ष आमदारांना फार मोठे महत्व आले आहे. त्यामुळे घोडेबाजाराची चर्चा रंगली आहे.

भाजपबरोबर जनसुराज्य पक्षातील १, राष्ट्रीय समाज पक्ष १ आणि ५ अपक्ष असे ७ आणि भाजपचे १०६ असे एकूण ११३ एवढे संख्याबळ आहे, तर अपक्ष व इतर पक्षांपैकी बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार जनशक्ती पक्ष २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, कम्युनिस्ट पक्ष १ आणि ८ अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदार आहेत. त्यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि इतर अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कारण बहुजन विकास आघाडीने आम्हाला कोणाचेही वावडे नाही. त्यामुळे ऐनवेळी भूमिका जाहीर करण्याचे ठरविल्याने महाविकास आघाडीदेखील त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

१६ छोट्या पक्षांचे, अपक्ष १३ आमदार
विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत, तर छोट्या पक्षांचे मिळून १६ आमदार आहेत. यामध्ये बहुजन विकास आघाडी-३, समाजवादी पाटी-२, एमआयएम- २, प्रहार जनशक्ती पक्ष-२, कम्युनिस्ट पक्ष-१, स्वाभिमानी शेतकरी संघटना-१, मनसे-१, राष्ट्रीय समाज पक्ष-१, क्रांतीकारी शेतकरी पक्ष-१, जनसुराज्य शक्ती-१, शेतकरी कामगार पक्ष-१ आणि इतर १३ अपक्ष आमदार मिळून एकूण २९ आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

महाडिक ठाकूर यांच्या भेटीला
धनंजय महाडिक यांनी आज बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत राज्यसभा निवडणुकीबाबत दोन तास चर्चा केली. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला महत्त्व आले आहे. या परिस्थितीतही बहुजन विकास आघाडीने आपल्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचेही वावडे नसल्याचे सांगत यासंदर्भात आम्ही ऐनवेळी भूमिका जाहीर करू, असे सांगत प्रमुख पक्षांना गॅसवर ठेवले आहे. या निवडणुकीत त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अपक्ष आमदार जोरगेवार नाराज
घोडेबाजार या शब्दावर आक्षेप घेत चंद्रपूरच्या अपक्ष आमदाराने महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला. घोडेबाजार हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वापरल्या गेल्यास अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. जोरगेवार संजय पवार यांचे अनुमोदक आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या