अकोला : राष्ट्रपती पदासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपसह विरोधकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या निवडणुकीमुळे अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला असून पक्षातील नेत्यांचे आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात उडी घेतील असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.
अकोल्यात पत्रकारांशी बोलत असताना सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावे त्यांच्याकडे कुठली उंची आहे? कारण, राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट उंची लागते, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी राज्य करत आहे.
राज्यात महिला, कष्टक-यांवर अन्याय होत आहे. या सरकारला मत का देऊ नये, हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागरण करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाच्या संविधानात मोठी ताकद आहे. राजकारणाला मी अस्पृश्य मानत नाही. त्यामुळे राजकारणात कधी जाणार, ते योग्य वेळी जाहीर करेन असेही सदावर्ते म्हणाले आहेत.