26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रसमीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार

समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार

एकमत ऑनलाईन

पिंपरी/मुंबई : आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नव्हे, तर समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी दिले. दरम्यान, मलिक यांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.

माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता ते यात माझा संबंध नाही, असे सांगत आहेत. आता समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मलिक म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते.एनसीबी खोट्या केसेस दाखल करत आहेत. हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हे अधिकारी आणि भाजपाचे नेते लोकांवर दबाव निर्माण करून या संस्थेच्या मार्फत हजारो कोटींचा वसुलीचा व्यवसाय महाराष्ट्रात करत आहेत. यांचा घोटाळा उघडकीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

मी वानखेडेंना आव्हान देतो. वर्षभरात त्यांची नोकरी जाईल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकायला पुढे आले होते. आता देशातील जनता तुम्हाला तुरुंगात जाताना बघेल. तुम्ही कीती बोगस माणूस आहात, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आगामी काळात ते पुरावे आम्ही बाहेर काढणार आहोत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरून दबाव होता, असे वानखेडे सांगतात. पण आता नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

देशसेवेसाठी तुरुंगात जायला तयार
नवाब मलिक यांनी माझी आई, वडील आणि बहिणीवर चुकीचे आरोप केले असून मी या आरोपांचे खंडन करतो. ते सांगत असलेल्या तारखेला मी दुबईला गेलेलो नव्हतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा अधिकार असू शकतो. मात्र, मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझे काम करत आहे. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि ऍण्टी ड्रग्ज ऑपरेशन करण्यावरून जेलमध्ये टाकत असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असे वानखेडे यांनी म्हटले आहे. माझ्या बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन त्यांनी हेरगिरी केली आहे, असा आरोपही समीर वानखेडे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या