34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रनिर्बंध व्यापारी विरोधात नाहीत : मुख्यमंत्री

निर्बंध व्यापारी विरोधात नाहीत : मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापा-यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये, अशीच भूमिका आहे. व्यापा-यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही आज केले.

राज्यातील विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या संवाद प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब ज-हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची आमची भूमिका नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे, अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेड्सची संख्या सात ते आठ हजार होती. ही संख्या आता आपण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे.

जम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केल्या नसतील अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपु-या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. नव्या लाटेत आता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे याचा विचार करून हे निर्बंध लावण्यात आले आहेत.

मुंबईची सुरक्षा महत्त्वाची
एकट्या मुंबईत कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या कामगारांचा प्रवास, येणे-जाणे, संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने करोनाचा पहिला हल्ला मुंबईवर झाला. आता दुसरा हल्लाही झाला आहे. बाहेरच्या राज्यांतून आणि परदेशातूनही येणे जाणेही मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील.

दुकाने बंद करणे नव्हे, गर्दी टाळण्याचा हेतू
खरे तर, दुकाने २४ तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केली होती. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतुक केले होते. पण आता परिस्थिती विचित्र झाली आहे. त्यामुळे व्यापा-यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

संकटाच्या काळात शत्रू, मित्र कळतात
संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी रस्त्यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या