24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रआता सांगली शहर बनणार ‘यलो सिटी’

आता सांगली शहर बनणार ‘यलो सिटी’

एकमत ऑनलाईन

सांगली : हळदीसाठी प्रसिद्ध असलेले सांगली शहर बनणार ‘यलो सिटी’ बनणार आहे. सांगलीच्या ब्रँडिंगसाठी सांगलीची ‘यलो सिटी’ करण्याचा निर्णय सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला आहे. यामुळे आता लवकरच सांगली महापालिकेच्या अनेक इमारती, अन्य शासकीय कार्यालये आणि प्रमुख मार्गावरील तसेच दर्शनी असणा-या इमारती यलो म्हणजेच पिवळ्या रंगाने उजळणार आहेत.

सांगली जिल्ह्याची ओळख ही हळदीची सांगली अशी जगभरात आहे. त्यामुळे या हळदीच्या शहराचे ब्रँडिंग करण्याच्या दृष्टीने सांगलीला हळदीप्रमाणे पिवळे करण्याचा मानस आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केला आहे. अशाप्रकारे एकाच रंगाचे शहर असणारी सांगली महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. आपल्या सांगलीच्या ब्रँडिंगसाठी यलो सिटी उपक्रमात क्रेडाईसह अनेक सामाजिक संस्था संघटना यांनी पुढाकार घेतला आहे.

शासकीय इमारत, कार्यालय पिवळ्या रंगाने उजळणार
महापालिकेच्या यापुढे होणा-या सर्व इमारतींचा रंग हा पिवळाच असणार असून अनेक शाळा सुद्धा पिवळ्या रंगाने रंगवल्या जाणार आहेत. यलो सिटी उपक्रमात सांगलीकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपली घरे, इमारती पिवळ्या रंगाने रंगवून घ्याव्यात किंवा आपल्या घराचा दर्शनी भाग हा पिवळ्या रंगाने रंगवून घ्यावा असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

सांगलीमधील हळदीला सव्वाशे वर्षांची परंपरा
सांगलीमधील हळदीला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. माहितीनुसार हळदीचा हा बाजार सांगलीतून सुरू झाला. सांगली ही देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. हळदीच्या उच्चतम गुणवत्तेमुळे सांगलीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. याच पिवळ्या धम्मक हळदीवरून सांगली शहर ‘यलो सिटी’ ब्रँडिंग करण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. सन २०००मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव राज्यातील पहिले ‘पिंक’ व्हिलेज ठरले होते. याच धर्तीवर आता आणखी एक गाव नव्हे तर पूर्ण शहर ‘यलो सिटी’ म्हणून नावाजलं जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या