34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रसंजय राठोड यांचा राजीनामा

संजय राठोड यांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. गत दोन आठवड्यांपासून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री राठो ड चर्चेत होते़ त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांची विकेट पडल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे भाजपच्या विरोधानंतर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला आहे.

राजीनामा देतो, पण
वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. राठोड आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली होती. यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी साधारण पाऊण तास या चौघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी राठोड यांनी राजीनामा देतो पण तो स्वीकारला जाऊ नये, अशी विनंती केली होती.

मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा
राठोड यांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा झाली. त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा आताच घेतला जाऊ नये. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असं मत शिंदे यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, राठोड यांच्याबाबत आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. माध्यमांना मला उत्तरं द्यायची आहेत, विरोधी पक्षाला उत्तर द्यायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती मिळतेय.

अखेर राठोडांचा राजीनामा
मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास १ तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

निष्पक्ष चौकशी होईल, राजकारण थांबवा – मुख्यमंत्री
संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पूजा चव्हाणला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात विरोधकांनी चालवलेल्या राजकारणावर जोरदार टीका केली. तपास नि:पक्षातीपणाने केला गेला पाहिजे. जर कुणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कुणी दोषी असेल. तर तो कोणी कितीही मोठा असला, तर त्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. अशी या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. मात्र केवळ राजीनामा घेणे व हातात काहीही पुरावे नसताना गुन्हा दाखल करून मोकळे होणे म्हणजे न्याय असत नाही. तपास यंत्रणेवर एखाद्याला सोडवण्यासाठी दडपण असता कामा नये. त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवण्यासाठी, आयुष्यातून उठवन्यासाठीही दबाव असता कामा नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पूजाच्या आई-वडिलांना विश्वास, विरोधकांचा नाही
पूजा चव्हाण या मृत तरुणीच्या आई-वडिलांनी आज आपली भेट घेऊन या प्रकरणावरून सुरू असलेले राजकारण व आपली बदनामी थांबवा अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पूजाच्या आई वडिलांनी दिलेले पत्रही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. ज्यांची मुलगी गेली आहे, त्यांचाही राज्याचा तपास यंत्रणेवर विश्वास आहे. संजय राठोड यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांचा मात्र तपास यंत्रणांवर विश्वास नाही. त्यांच्या काळातही हेच पोलीस होते. आताही तेच आहेत. मग हे दुतोंडी राजकारण कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावं
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणतेही पुरावे नसताना विरोधकांनी रान उठवले आहे. याच काळात मुंबईत आणखी एक आत्महत्या झाली. सात वेळा खासदार असलेल्या मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी १५ पाणी पत्र लिहून ठेवले आहे. यात भाजपच्या काही उचपदस्थ लोकांची नावं आहेत. त्यांच्यावरही चौकशी न करता कारवाई करायची का ? असा सवाल करताना, मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या दुटप्पीपणावर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक चर्चेत
दुसरीकडे बंजारा समाजाचे नेतृत्व असलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राठोड यांना पदावरुन काढून टाकण्यासाठी म्हणजेच बंजारा समाजाच्या मोठ्या नेतृत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काही जणांकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी पुसदचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी इंद्रनील मुंबईत असल्याची बाब सूत्रांकडून कळली आहे.

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या