मुंबई : गेल्या महिनाभरात संजय राऊत आणि नवनीत राणा या दोन खासदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवले आहे. आपल्या राजकीय विरोधकांवर रोज धडाडणा-या या तोफा आहेत तरी कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. मीडियाच्या कॅमे-यापासून दूर असलेले संजय राऊत आणि नवनीत राणा सध्या लडाखच्या सीमेवर आहेत.
एरवी एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे हे दोन्ही खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाखमध्ये आहेत. त्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जरी तापले असले तरी लडाखच्या थंड हवेत सध्या दोन्ही खासदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. एकाच समितीतून दौरा करताना संजय राऊत आणि नवनीत राणा यांची भेट झाली का?, राजकीय संघर्षाचे या दौ-यात पडसाद उमटले का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र आल्याची काही दृश्यं समोर आली आहेत. रवी राणा आणि संजय राऊत हे एकत्रित जेवण करताना देखील दृश्यांमध्ये दिसत आहे. तर काही दृश्यांमध्ये ते दोघं गप्पा मारतानाही दिसत आहेत.