23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्र'पहिले आप' 'पहिले आप'नंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्विकारला पदभार

‘पहिले आप’ ‘पहिले आप’नंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्विकारला पदभार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. खुद्द भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबद्दल घोषणा केली होती. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये कारभार स्वीकारला. यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरून त्यांना खुर्चीवर बसवले. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात पोहोचले. आज त्यांचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेते पोहोचले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांचा शाल देऊन सत्कार केला.

त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांना आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमध्ये विराजमान होण्याचे सांगितले. पण, मुख्यमंत्री शिंदे त्यांना आधी तुम्ही बसा असा आग्रह करत होते. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांचा हात धरला आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. यावेळी टाळ्या वाजवून सर्वांनी अभिनंदन केले. त्यानंतर फडणवीस यांनी टेबलवर असलेला पेपर शिंदे यांच्यासमोर ठेवला आणि सही करण्यास सांगितले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री फडणवीसही शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते. त्यामुळे आजपासून शिंदे आणि फडणवीस सरकारच्या कारभाराला अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सूनबाई वृषाली शिंदे आणि नातू हे आले होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो लावले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या