मुंबई, दि. ७(प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी हे संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे केंद्राने अनुमती दिली असली तरी राज्यातील शाळा १५ आँक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बैठकीत दिले.
देशात अनलाँक ५ सुरु असून १५ आँक्टोबरनंतर शाळा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. मात्र शाळा उघडण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे. देशात कोरोना संपलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळा व राज्य सरकारची असेल. याबाबतच्या एसओपी(मानक कार्यप्रणाली) राज्यांनी ठरवण्याचे अधिकार दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा १५ आँक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाली. गेल्या काही महिन्यांपासून आँनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा – पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी