मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेचा पांिठबा मिळण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा संजय पवार हेच शिवसेनेचे सहाव्या जागेवरील उमेदवार असतील, हे स्पष्ट केले.
राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेकडे पुरेशी मतं आहेत. मी आणि संजय पवार लवकरच राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरू. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. आम्ही संभाजीराजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यायला तयार होतो.
सहाव्या जागेसाठी लागणारी ४२ मते आमच्याकडे होती. पण आम्ही ही मतं अपक्ष उमेदवाराला कशी देणार, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे आता मराठा संघटनांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करतील.
उद्या म्हणजेच २६ तारखेला शिवसेनेचे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर संजय राऊत तत्काळ २७ तारखेला कोल्हापूरला जाणार आहेत. २८ तारखेला संजय राऊत यांची कोल्हापुरात सभा होणार असून ते संभाजीराजे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. शिवसेना संपर्क अभियानासाठी संजय राऊत कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती आहे.