मुंबई : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. राज्यसभा निवडणुकीची चुरस असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचीही तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपले सर्वस्व पणाला लावून या निवडणुकांच्या लढतीत उतरत आहेत.
अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मात्र यामुळे शिवसेनेतल्या मंत्रिपदावर असलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. विशेषत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई सध्या राज्याचा उद्योग, खाण आणि मराठी भाषा विभाग सांभाळत आहेत. विधान परिषदेसाठी जर त्यांना सदस्यत्व मिळाले नाही, तर सहा महिन्यांपेक्षा जास्त त्यांना मंत्रिपदावर राहता येणार नाही. त्यामुळे आता या उमेदवारीमुळे त्यांच्या मंत्रिपदाचे काय होणार? मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.