मुंबई: जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणां ना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. शिवडी न्यायालयाचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच शिवडी न्यायालयाने जारी केलं अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला.
खासदार नवनीत राणा यांनी शिवडी न्यायालयाच्या आदेशाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. शिवडी न्यायालयानंही नवनीत राणा यांचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता. खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्राप्रकरणी २०१४ साली मुलूंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून२०२१ रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणा-या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.