मुंबई : शिवसेना बंडखोरांनी आपलाच गट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आक्रमक पवित्रा घेत स्व.बाळासाहेबांचे नाव कशाला घेता, स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, अशा तिखट शब्दांत बंडखोरांना फटकारले. शिवसेनेशी गद्दारी करणा-यांना पुन्हा पक्षात थारा मिळणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.
शिवसेनेच्या आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पाच ठराव संमत करण्यात आले असून, बंडखोरांवरील कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. दरम्यान, आज १६ बंडखोरांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली असून, ४८ तासांत उत्तर देण्याचा अल्टिमेटम दिला आहे, तर शिवसेना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याने बंडखोरांच्या कार्यालयांवर हल्ले सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना भवनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दात बंडखोरांचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा गट स्वत:ला शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, असे संबोधत आहे. हाच धागा पकडताना बंडखोरांनी स्वत:च्या बापाचे नाव लावून मते मागावीत, असे ठाकरे यांनी फटकारले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही, असे सांगितले. हे नाव शिवसेनेचे आहे. शिवसेनेसोबत राहील. कोणत्याही बेईमान आणि गद्दार या नावाचा राजकारणात वापरू शकणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.
राष्ट्रीय कार्यकारिणीत ५ ठराव
-पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल तूर्त कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी रणनीती ठरवत बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
-शिवसेना बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल, असा ठरावही करण्यात आला.
-बाळासाहेब ठाकरे यांचे नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाहीे. हे नाव शिवसेनेचे आहे. शिवसेनेसोबत राहील.
-शिवसेना स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे धोरण पुढे नेईल.
-मराठी अस्मितेचा विचार आहे. तोही पुढे नेला जाईल, असा ठरावही मंजूर करण्यात आला.
शिंदे-फडणवीस भेटले
बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे काल (शुक्रवार) दिल्लीत जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ते गुजरातमध्ये दाखल झाले होते, असे सांगण्यात येत आहे. गुजरातमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. कारण फडणवीसही काल बराचवेळ सागर बंगल्यावर नव्हते. रात्री उशिरा ते दाखल झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीला दुजोरा दिला जात आहे.