Thursday, September 28, 2023

मंत्रिमंडळ विस्ताराला शहांचा हिरवा कंदिल!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीला केंद्रातील मंत्रिमंडळात होणारे फेरबदल आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापण दिनाच्या आधी म्हणजेच १९ जूनच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि. ५ जून रोजी प्रसारमाध्यमांना दिली.

भाजपाचे जेष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य मंत्रीमंडळाच्या जवळपास वर्षभर रखडलेल्या विस्ताराला हिरवा कंदील मिळाला आहे. मंत्रीमंडळ विस्तार, आगामी निवडणुका व महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रकल्पांसह अनेक विषयांवर अमित शहा यांच्यासोबत सहविस्तर चर्चा झाली असून, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती एकत्र लढवणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी संध्याकाळी दिल्लीत जाऊन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बराच वेळ चाललेल्या या बैठकीत राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार, आगामी निवडणूका तसेच राज्यातील विविध प्रकल्प यासंदर्भात या सहविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो.

राज्य मंत्रींमंडळ विस्ताराबाबत अमित शहा यांच्याशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. लवकरच विस्तार करण्यात येईल. आगामी लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्रितच लढवणार आहोत. रामदास आठवले यांचा आरपीआय देखील आमच्या सोबतच असणार आहे. मुंबई महापालिकाही आम्ही एकत्र व पूर्ण ताकदीने लढणार आणि बहुमताने जिंकणार देखील आहोत. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार गेले ११ महिने अतिशय एकजुटीने काम करते आहे. आम्ही अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आमची युती वैचारिक आहे असेही ते म्हणाले.

यूतीत मतभेद नाहीत
राज्यातील अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. सरकारमध्ये किंवा युतीत कोणतेही मतभेद नाहीत. तसे आरोप करणा-या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आधी अडीच वर्षे स्पीडब्रेकर होते. पण आता मुंबईसह राज्यभरात अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून याची तारीख मुख्यमंत्री जाहीर करतील असे सांगितले.

सर्व निवडणुका युती म्हणून लढवणार : फडणवीस
येणा-या सर्व निवडणुका युती म्हणून लढवण्याबाबतही दिल्लीतील भेटीत चर्चा झाली असून जिल्हा तसेच तालुका पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये समन्वय घडवण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

विस्तार वर्धापन दिनापूर्वी की नंतर ?
१९ तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. दसरा मेळाव्याप्रमाणेच यंदा शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे होणार आहेत. ३० जून रोजी शिंदे सरकारचे एक वर्ष पूर्ण होत आहे. मुंबई महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आहे. त्यामुळे वर्धापन दिन सोहळ्यात मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होईल. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतोद भारत गोगावले यांनी वर्धापन दिन सोहळ्यापूर्वी विस्तार होईल, असे संकेत आज दिले. पण वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या लोकांची नाराजी प्रकट होऊ नये यासाठी वर्धापन दिनानंतर, पण पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेच्या दोन खासदारांना मंत्रीपदाची संधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर शिवसेनेच्या दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे दोन खासदार नेमके कोणते? यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी बारा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहे. मात्र, या बारा खासदारातून दोन खासदारांना आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या