पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. रोज कोणत्या न कोणत्या विषयामुळे शरद पवारांचे नाव समोर येतच आहे. मग राज ठाकरेंची सभा असो, केतकी चितळेची पोस्ट असो किंवा ब्राह्मण संघटनांची भेट असो. आता पुन्हा एकदा शरद पवार चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे ते आज दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
ब्राह्मण संघटनेच्या भेटीनंतर आता शरद पवार आज पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. शरद पवार यांनी स्वत: ही इच्छा बोलून दाखविली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे शरद पवारांना जातीयवादी संबोधले होते, तसेच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच ब्राह्मण संघटनांची भेटही शरद पवार यांनी घेतली होती. आणि आता पुण्यात गणपतीच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भूमिका बदलली?
शरद पवार सहसा एखादे मंदिर किंवा प्रार्थनास्थळी गेलेले दिसत नाहीत. मात्र आता त्यांनी दर्शनाची इच्छा बोलून दाखवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता शरद पवारांनी काही भूमिका बदलली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ब्राह्मण संघटनांनी विनंती करत चर्चेचे निमंत्रण दिल्याचे शरद पवारांनी चर्चेनंतर सांगितले होते आणि आता पवारांनी दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेतल्याची इच्छा व्यक्त केल्याने ही कसली खेळी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.