मुंबई : एकनाथ शिंदे आणि बंडखोर नेत्यांची मनधरणी करायला जाणारे शिवसेनेचे नेते रविंद्र फाटकही आता शिंदे गटात सामील झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरताला गेलेले रविंद्र फाटकच शिंदेंच्या गटात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी फाटक एकनाथ शिंदेचे मन वळवण्यासाठी सुरत येथील हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर आज आता ते थेट गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या गटात सहभाग होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, राज्यात सत्तांतराचे वारे आता जोरात वाहू लागले आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी रवींद्र फाटक यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे आणि संजय राठोड हेसुद्धा गुवाहटीमध्ये दाखल झाले झाले आहेत. रवींद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. तेच आता शिंदेंच्या गटात सहभागी होत असल्याने शिवसेनेची अंतर्गत नाराजी आणि वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंचें निकटवर्तीय असणारे फाटक विधान परिषदेचे आमदार आहेत. एवढेच नव्हे तर, मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत फाटक मुंबईतून शिंदेची मनधरणी करण्यासाठी सूरत येथे गेले होते. मात्र, आता ते स्वतःच गुवाहटी येथे जाऊन शिंदेंना सहभागी झाले आहेत.