औरंगाबाद : एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार देखील स्थापन केले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणा-या पदाधिका-यांची संख्या वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.
औरंगाबाद शहरातील आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समोर एक गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ श्ंिदेंचा मलादेखील फोन आला होता; पण मी त्यांना स्पष्ट सांगितले, मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. आपल्यातील काही आमदार तुम्हाला सांगतील तुमच्यासाठी हे केले, ते केले.
पण त्यांना सांगा तुला निवडून मी आणले आहे. तुला निवडून येण्यासाठी आम्ही काम केले, असे सांगा, असे आवाहनही आमदार दानवेंनी कार्यकर्त्यांना केले. कुठल्याही गद्दाराची आठवण येणार नाही, एवढी जनता आपल्यासोबत आहे. कुणाची आठवण येण्याची गरजही नाही, असा टोलादेखील दानवेंनी बंडखोर आमदारांना लगावला.