34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रशाखा जबरदस्तीने ताब्यात घेण्यास शिंदे गट सरसावला?

शाखा जबरदस्तीने ताब्यात घेण्यास शिंदे गट सरसावला?

एकमत ऑनलाईन

शाखांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची ठाकरे गटाची मागणी
ठाणे : शिंदे गट आता शिवसेनेच्या सर्व शाखा ताब्यात घेण्यासंदर्भात सरसावला आहे. कारण शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षही त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता शाखा ताब्यात घेण्यावरून टोकाचा वाद उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षाच्या सर्व शाखांबाहेर पोलिस तैनात करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

ठाण्याच्या लोकमान्य नगर येथील शिवसेना शाखा रविवारी ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला होता. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील सर्व शिवसेना शाखांना आणि पक्षाच्या इतर मालमत्तांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. राजन विचारे यांनी यासंदर्भात ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना प्रस्ताव पाठवला आहे. यावर पोलिस आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते. त्यामुळे आता शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष झाला आहे. त्यामुळे या नव्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखा आणि कार्यालये ताब्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदे गटाकडून शिवसेनेशी संबंधित मालमत्ता ताब्यात घेतल्या जाऊ शकतात.

शिवसेनेच्या आणि ठाकरेंच्या आतपर्यंतच्या राजकीय वाटचालीत शाखांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. याच शाखांच्या माध्यमातून शिवसेना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार झाले आहे. मुंबईत शिवसेना पक्ष तळागाळात रुजण्यात शाखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या शाखांकडे स्थानिक राजकारणाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या शाखा शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यास ठाकरेंची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या