मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आरोप-प्रत्यारोप होत असताना संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकावण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले. काल (१८ फेब्रुवारी) उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ बाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधन केल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने शिवसेना आणि शिवसेनेचे चिन्ह आमच्याकडून हिसकावून घेण्यात आले तो न्याय नाही, सत्य नाही, असे मी ट्विट करून देशाला कळवले आहे. हा व्यवहाराचा व्यवसाय झाला आहे. तो विकत घेतला गेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हिसकावण्यासाठी २००० कोटी रुपये खर्च झाले, ही माझी प्राथमिक माहिती आहे. हा निवाडा विकत घेतला आहे.
६ महिन्यांत झाले व्यवहार
संजय राऊत म्हणाले, सहा महिन्यांत २ हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. बेइमान लोकांचा एक गट आमदार खरेदीसाठी ५० कोटी, खासदार खरेदी करण्यासाठी १०० कोटी, नगरसेवक खरेदी करण्यासाठी १ कोटी आणि शाखाप्रमुख घेण्यासाठी ५० लाख खर्च करू शकतो. पक्षाचे नाव आणि लक्ष्य मिळविण्यासाठी माझा अंदाज आहे की आतापर्यंत २००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मी या दाव्यावर ठाम आहे.
लवकरच पुरावे देणार
संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाला वाटलं तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आतापर्यंत चिन्ह आणि नाव यावर २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. मी ट्वीट करून देशाला ही माहिती दिली आहे. आमच्याकडून आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यात आले आहे त्यासाठी ही एवढी मोठी डील झाली आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे. त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ.