25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र शिवसेनेला मतांची चिंता

शिवसेनेला मतांची चिंता

एकमत ऑनलाईन

मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आॅफिशियल ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसने विरोध दर्शवला होता. विरोधानंतरही शिवसेनेकडून नामांतराबाबत वक्तव्ये केली गेली. यावर आता काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा नामांतराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले सदर ‘रोखठोक’मधून काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

‘औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणे ‘सेक्युलर’ नव्हे!, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला टोले लगावले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे.

सल्ला देणा-यांच्या संख्येत वाढ
ट्वीटमध्ये थोरात म्हणतात, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाºयांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे
थोरात यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्याचा आधार घ्यावा लागतो आहे.

आमच्या आदर्शाचा वापर मतांसाठी
राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे, थोरात यांनी म्हटले आहे की, राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाºयांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असे ते म्हणाले.

आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर
महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकºयांच्या, कष्टकºयांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही.

काँग्रेसला सेक्युलॅरिझम शिकवण्याची गरज नाही : ठाकूर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या खरमरीत उत्तरानंतर ‘काँग्रेसला सेक्युलॅरिझम शिकवण्याची गरज नाही’, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला बजावले आहे. ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून यांचा खुलासा झाल्यानंतर पुढचे बोलता येईल’ असा थेट इशाराच यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या