मुंबई,दि.१०(प्रतिनिधी) अभिनेत्री कंगना रनौतने आपला तोंडपट्टा थांबवलेला नसला तरी, सत्तेत असताना आक्रमक भूमिका घेऊन स्वतःची प्रतिमा डागळुन घेण्याऐवजी या वादाला पूर्णविराम देण्याचा शहाणपणाचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला आहे. आमच्याकडे आणखीही कामं आहेत, असं सांगताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर पडदा टाकला.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगना रनौतने राज्य सरकार, मुंबई पोलीस, शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला प्रत्त्युत्तर देताना शिवसेनेने दिलेले आव्हान स्वीकारत कंगनाने थेट शिवसेनेवर हल्ला चढवला. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम तोडल्याने हा संघर्ष आणखी चिघळला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट एकेरी भाषेत आव्हान देत संघर्ष दिले.
महापालिकेच्या कारवाईमुळे शिवसेनेलाही टीकेला तोंड द्यावे लागत होते. राज्यातील आघाडी सरकारचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहाण्या माणसांनी अशा भानगडीत पडू नये असा वडीलकीचा सल्ला दिला. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या रात्री झालेल्या बैठकीत शरद पवार व मुख्यमंत्र्यांसोबत खा. संजय राऊत हे ही उपस्थित होते. संजय राऊत यांनी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा विषय आमच्यासाठी संपल्याचे सांगितले. कंगनाप्रकरण आम्ही विसरून गेलो आहोत.
कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं सांगतानाच या केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल विचारता, ११ कोटी मराठी जनतेने सर्व ऐकले आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर विचारता,महापालिकेत कायदेशीर विभाग आहे. त्यांच्याशी, किंवा महापौरांशी तुम्ही याबाबत बोलू शकता, ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्यावर मत व्यक्त करणार नाही, असे उत्तर राऊत यांनी दिले.
कोविड-१९ आजाराला हलक्यात घेऊ नका; पंतप्रधानांचं जनतेला आवाहन