28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्र५५ आमदारांना शिवसेनेचा व्हीप

५५ आमदारांना शिवसेनेचा व्हीप

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार, दि. १७ ऑगस्टपासून सुरू होत असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधानसभेच्या सर्व ५५ आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला. अधिवेशन काळात रोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचे पक्षादेशात म्हटले आहे. आता शिंदे गट काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली. शिवसेनेचा पक्ष प्रतोद नेमका कोण, याचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उद्यापासून होणा-या अधिवेशनात सरकारच्या वतीने अनेक विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावेळी कदाचित मतदानाची वेळ येऊ शकते. त्यामुळेच ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला. इतर सर्व पक्षांनी त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावरच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी ही २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी शिंदे गटाने शिवसेना आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला असून तो वादही आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण ६ याचिका दाखल असून यामध्ये पक्ष प्रतोद पदाच्या वादाचाही विषय आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या