मुंबई : महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाले असून उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी केले होते. पण आमच्याकडे बहुमत आहे, दोन तृतियांश बहुमत आमच्याकडे असल्याने आम्हाला शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला आहे. तर शिंदे आणि फडणवीस सरकारने राहुल नार्वेकर यांचा अर्ज भरला आहे. यासाठी उद्या मुंबईत मतदान होणार आहे. दरम्यान मतदानासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्याकडे दोन तृतियांश आमदार आहेत. बहुमत असल्यामुळे शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही असे शिंदे यांनी सांगितले.