मुंबई : शिवसेनेचे नेते एकापाठोपाठ एक अडचणीत येताना दिसत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने पक्षाचे माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या दुबईतील कंपनीची चौकशी सुरू केली आहे. संबंधित कंपनी जाधव कुटुंबियांकडून २०१८ साली स्थापन केली होती. त्याच वर्षी ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. ही कंपनी स्थापन करताना fema कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.
जाधव यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या खात्यात कोरोनाच्या काळात पाच कोटी रुपये जमा करण्यात आले होते. यातील अर्धी रक्कम रोख स्वरूपात जमा करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने जाधव आणि त्यांच्या दोन मुलांना मंगळवारी समन्स पाठवले होते. ईडीच्या समन्सकडे जाधव यांनी पाठ फिरवली पण त्यांच्या एका मुलाने ईडीकडे जाब नोंदवलाय. ईडीकडून आता नव्याने समन्स काढला जाण्याची शक्यता आहे.
जाधव यांच्या मुलाच्या नावावर दुबईत स्थापन झालेल्या कंपनीची गेल्या वर्षी आयकर विभागाने चौकशी सुरू केली होती. ही चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित कंपनी बंद करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. ईडी आणि आयकर विभागाला असा संशय आहे की बीएमसीच्या स्थायी समितीचे चेअरमन असताना जाधव यांनी हवालाच्या माध्यमातून दुबईतील कंपनीत पाच कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणी जाधव यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.