रायगड : गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार दूर्ग प्राधिकरण स्थापन करेल. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करून त्याचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. त्याचबरोबर रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ४५ एकर जागेवर शिवसृष्टी उभारली जाईल, तसेच त्यासाठी पहिल्याच टप्प्यात ५० कोटींचा निधी देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगडावरून केली.
रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती होती.
रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ््यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ््याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आला. या पालखी सोहळ््यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.
दिल्लीत राष्ट्रीय स्मारकासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेही मावळे आहोत. त्यामुळे दिल्लीत महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, म्हणून प्रयत्न करणार. आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ््यानिमित्त किल्ले रायगडावर बोलत होते. राज्यातील सहाही महसुली विभागात शिवरायांच्या जीवनावर त्यांचा इतिहास सांगणारे उद्याने निर्माण केले जातील, अशी घोषणाही देवेंद्र फडवणीस यांनी केली. यासाठी पहिल्याच टप्प्यात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ते म्हणाले.
शिवरायांचे जीवन प्रेरणा देणारे : मोदी
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन प्रेरणा, नवीन चेतना देणारा आहे. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण ही त्यांच्या शासन व्यवस्थेचे मुलतत्वे राहिली आहेत. शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणली. त्यांनी भारताची एकता आणि अखंडता सर्वतोपरी ठेवली. त्यामुळे आज एक भारत-श्रेष्ठ भारत या योजनेमध्ये शिवाजी महारांच्या विचारांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी फार भाग्याचा दिवस असल्याचे म्हटले.