रायगड : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली २ वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा स्वराज्याची राजधानी असणा-या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी शिवरायाच्या जयघोषाने किल्ले रायगड दुमदुमले. या निमित्ताने संपूर्ण रायगड परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता.
रायगडावरील सोहळा पाहण्यासाठी रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी झाली. यंदा ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’ या संकल्पनेनुसार रायगडावर हा सोहळा साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ््याची तयारी करण्यात आली होती. आज शिवराज्याभिषेक सोहळ््यादरम्यान संभाजीराजे छत्रपती काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, मी राज सदरेवर राजकीय भाष्य करणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पद्धतीमुळे लोकसंचय वाढला. शिवाजी महाराजांच्या अखंड ध्यासामुळे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे स्वराज्य उदयास आले आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आधी ध्वजपूजन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करू राज्याभिषेक सोहळा पार पडला.
शिवरायांना अडविण्यासाठी बाप-लेकात भांडणे लावली
शिवरायांना अडवण्यासाठी बाप-लेकांत भांडणे लावली होती, असे सूचक वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर केले. राज्यसभेला अपक्ष उमेदवारीला पाठिंबा न दिल्याच्या प्रकरणावरून संभाजीराजे शिवसेनेवर नाराज असल्याचे यावरून दिसून आले. प्रस्थापित स्वराज्याला सुरुंग लावणार हे त्यावेळीच शिवाजी महाराजांना कळाले होते, असेही ते म्हणाले.