मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह मुंबईमध्ये सुरू असलेला कोरोना विषाणूचा थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. मात्र अशावेळी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोना संक्रमाणाचा धोका वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते ५४ वर्षांचे होते.
शिरीष दीक्षित हे मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. मृत्यूच्या एकदिवस अधिपर्यंत ते कामावर रुजूच होते. दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. परंतु मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली. दरम्यान डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत त्यांनी अंतिम श्वास घेतला. निधनानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घरातील इतर सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या तब्बल ५५ कर्मचाऱ्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. त्यात आता एका मोठ्या पदावरच्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू होणं ही महापालिकेसाठी चिंतेची बाब आहे.
Read More द कारगील गर्ल हा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. तर १७०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत मुंबईतील २२ हजार ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला मुंबईमध्ये कोरोनाचे एकूण २६ हजार ३४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.