22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमहाराष्ट्रतीन मुले पाण्यात बुडाली; वाचविण्यासाठी गेलेल्या आईचाही मृत्यू

तीन मुले पाण्यात बुडाली; वाचविण्यासाठी गेलेल्या आईचाही मृत्यू

एकमत ऑनलाईन

धामणगाव  : अंघोळीसाठी नदी पात्रात उतरलेली तीन मुले पाण्यात बुडाली. त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी नदी पात्रात उतरलेल्या आईचाही यावेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या चौघांना बुडताना पाहून वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नदीवरील इतर दोन महिला जखमी झाल्या आहेत.

धामणगाव तालुक्यातील निभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात बुडून 3 मुले आणि आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. यावेळी त्या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. एकादशी निमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करायला गेल्यानंतर ही घटना घडली आहे. यश चवरे (13), जीवन चवरे(14), सोहम झेले (12), पुष्पा चवरे अशी मृतांची नावे आहेत. तर यावेळी बुडणाऱ्या या चौघांना वाचविण्याच्या प्रयत्नान इतर दोन महिला देखील जखमी झाल्या आहेत.

पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली होती. पुजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तीनही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी नदीपात्रावर उपस्थित असलेल्या इतर दोन महिलांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. यामध्ये त्या दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. यातील एका महिलेला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य एका महिलेवर धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयत उपचार सुरू आहेत.

निभोरा गावाच्या बाजूनेच समृद्धी महामार्ग जात आहे. या मार्गाच्या कामासाठी नदीत अवैधरित्या खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, नदीच्या पात्रात प्रचंड पाणी असल्याने हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात बुडून माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारावर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई द्यावी – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या