गडचिरोली : गेल्या ४ दिवसांपासून सातत्याने कोसळणारा पाऊस आता थांबला आहे. मात्र, सिरोंचा तालुका अद्याप पुराने वेढलेला आहे. मेडिकट्टा आणि गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा फटका अहिरे तालुका आणि सिरोंचाला बसला. अहिरेमधील पूरस्थिती कमी झाली असली तरी सिरोंचा तालुक्यामध्ये अद्याप पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुराने सिरोंचाला वेढा दिला आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे पूरस्थिती भयावह आहे. गेल्या ४ दिवसांपासून सिरोंचा शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा महाबंधा-यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या पुराचा वेढा वाढत आहे.
पर्लकोटा नदीलाही पूर
गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या नदीचे पाणी शहरात शिरले आहे, तर पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासह १२० गावांचा जिल्हा मुख्यालयांशी संपर्क तुटल्याचीही माहिती आहे.
तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार
राज्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र, पुढील ३ दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.