मुंबई,दि.२७ (प्रतिनिधी) राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कुंटे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे रविवारी सेवानिवृत्त होत आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीला संजय कुमार उपस्थित राहतील. त्यानंतर सोमवारी सकाळी कुंटे हे संजय कुमार यांच्याकडून मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील.
मुख्य सचिव पदासाठी कुंटे यांच्यसह अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे नाव चर्चेत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कुंटे यांच्या नावाला पसंती दिली.
सीताराम कुंटे हे १९८५ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. त्यांना प्रशासकीय सेवेचा ३६ वर्षाचा अनुभव आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दरम्यान, निवृत्तीनंतर संजय कुमार यांची राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे समजते.