18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात आतापर्यंत २५ कर्मचा-यांच्या आत्महत्या

राज्यात आतापर्यंत २५ कर्मचा-यांच्या आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील २४ तासांत दोन एसटी कर्मचा-यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पगार वेळेवर न मिळाल्याने बीड आगारातील बसचालकाने गळफास घेतला तर पुंढरपुरातही एसटी कर्मचा-याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडून पडले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात कर्मचा-यांच्या वेतनाला उशीर होत आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना स्थळी सुरक्षित पोहोचवणा-या एसटी चालक व कर्मचा-यांवर असा आर्थिक ताण असणे घातक ठरू शकते.

कोरोना काळानंतर वेतन थकल्यामुळे एसटी महामंडळाचे असंख्य कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. यातील बहुतांश कर्मचारी कर्जबाजारी आहेत. कोरोना प्रादुर्भावात आतापर्यंत २५ कर्मचा-यांनी आपले जीवन संपवले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.

२४ तासांत २ आत्महत्या
पगार वेळेवर न झाल्याने बीड आगारातील चिंताग्रस्त बसचालकाने ११ ऑक्टोबर रोजी घरात गळफास घेत आत्महत्या केली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने येथील अनेक कर्मचा-यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान १२ ऑक्टोबर रोजी राज्य परिवहन महामंडळाने रखडलेले वेतन जारी केल्याची घोषणा केली. दुसरीकडे, पंढरपुरातही एसटी कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचा-याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १२ ऑक्टोबरला ही घटना घडली.

औरंगाबादेत ७० टक्के कर्मचारी कर्जबाजारी
राज्यात एसटी महामंडळाचे ९७ हजार कर्मचारी आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचे ८१ हजार कर्मचारी सभासद आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार, या बँकेतर्फे एक हजार ६१२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास एक हजार ८२० कर्मचा-यांनी कर्ज घेतले आहे. ही आकडेवारी जवळपास ७० टक्क्यांच्या घरात जाते. अशीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण ३४,००० चालक, ३१,००० वाहक आणि ३२,००० इतर असे एकूण जवळपास ९७००० एसटीचे कर्मचारी आहेत.

वेतनाचा प्रश्न सुटणार : परिवहन मंत्री
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमांतर्गत दुस-या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचा-यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून, लवकरच त्यांना सप्टेंबर महिन्याचे वेतन देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

कर्मचा-यांना मिळणार दिलासा
एस.टी. महामंडळास एकूण रु. ४२८ कोटी ८८ लाख ६२ हजार २०० इतका निधी मंजूर झाला. मे महिन्यात पहिल्या टप्प्यातील रु. १९७ कोटी ५८ लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाची रक्कम यापूर्वीच एस.टी. महामंडळाला मिळाली आहे.
दुस-या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख २२ हजार २०० रुपयांचा निधी एस.टी. महामंडळाला देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निधीमधून एस.टी. कर्मचा-यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. असेही मंत्री परब यांनी यावेळी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या