मुंबई : मागील काही वर्षांपासून आरे येथील मेट्रो कारशेडबाबत वाद सुरू आहे, फडणवीस सरकाराच्या काळात झालेल्या या निर्णयाला सर्व स्तरातून जोरदार विरोध करण्यात आला होता, शिवसेनेने विरोध केला आणि मविआ सरकारच्या काळात हे काम थांबवण्यात आले.
मात्र नव्या सरकारकडून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आधीच्या सरकारचा आरे मेट्रो कारशेडचा निर्णय बदलण्यात आला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेतच होणार असे संकेत दिले.
दरम्यान, आरे कारशेडच्या बाबतीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधु तसेच मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे एकमत झाल्याचे दिसून येत आहे.
अमित ठाकरे यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे, विकास हवा पण पर्यावरण उद्ध्वस्त करून नको असे, सांगताना अमित ठाकरे म्हणाले की, आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपले पर्यावरण उद्धवस्त झाले तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचे भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवे.