पुणे, प्रतिनिधी- जिल्ह्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता वेग येतो आहे. पदयात्रांच्या अथवा सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप त्याचप्रमाणे परस्परावर टीका-टिप्पणी करण्यात येते आहे त्यामुळे प्रचारात रंग भरू लागला आहे.
जिल्ह्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या दि. २६ रोजी मतदान होत आहे. राज्य आणि केंद्रीय स्तरावरील नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे मेळावे याचे नियोजन करण्यात येत आहे कारण आता प्रचारासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. हे लक्षात घेता अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. त्या-त्या भागातील प्रलंबित समस्याची मांडणी करण्याबरोबर त्यावरची संभाव्य उपाययोजना कशा प्रकारे करता येणार यावर देखील उमेदवार भर देताना दिसत आहेत .
सर्वसाधारणपणाने पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी तुलनेत कमी असते मात्र आगामी दीड वर्षाच्या कालावधीत पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे ही पोटनिवडणूक म्हणजे एका अर्थाने रंगीत तालीम असणार आहे.कारण अजून महानगरपालिकांच्या निवडणुकीचा, त्यानंतर लोकसभा आणि नंतर होणा-या विधानसभा निवडणुका पाहता या पोटनिवडणुकांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे . त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर अधिक भर दिला जाईल असे वाटते. तसेच या पोटनिवडणुकीसाठी शासकीय स्तरावर देखील तयारी करण्यात येत आहे. मतदान केंद्राची पाहणी, मतदानासाठी यंत्रणा, त्यासाठीचे आवश्यक असणारे प्रशिक्षण यावर भर दिला जातो आहे .