पुणे : साखर उद्योगासमोरील विविध प्रश्न, साखर निर्यात, इथेनॉल उत्पादन, वाढते ऊस उत्पादन, ऊस तोडणीचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय साखर परिषद येत्या दि. ४ आणि ५ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत.
साखर आयुक्तालय, राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या परिषदेसाठी व्हीएसआयचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री ठाकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राज्यस्तरीय साखर परिषद आणि आधारस्तंभ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या परिषदेत साखर उद्योगासमोरील समस्या आणि उपाययोजना, साखर उद्योगासाठी नवे संशोधन तंत्रज्ञान, याचा स्वीकार तसेच साखर उद्योगनिगडीत तांत्रिक सत्र आदीचा समावेश असणार आहे. यामध्ये ऊस शेतीतील यांत्रिकीकरण, सिंचन पद्धती, इथेनॉल निर्मिती, नवीन उसाचे वाण, जमीन सुपीकता आणि आधुनिकीकरण, आदीचा समावेश असणार आहे.
व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले, गेली ४ ते ५ वर्षे साखर उद्योग हा अडचणीत होता. काही वेळा कमी किमतीत साखर विकण्याची वेळ आली. सर्वसाधारण गाळप हंगाम १४० ते १६० दिवस सुरू राहतो. पण काही वर्षे हा हंगामाचा कालावधी ७० ते ९० दिवसांवर आला आहे. त्याचा फटका या उद्योगाला बसला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत परिस्थिती समाधानकारक झाली आहे. गतवर्षी निर्यात चांगली झाली आहे. ती साधारण ९० लाख टन इतकी झाली होती. मुख्य म्हणजे ऊस तोडणीसाठी कामगार कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत त्यामुळे त्यावर यांत्रिकीकरण हा एक मार्ग आहे. त्याचा विचार करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.