22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांचे ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन

राज्यातील शेतक-यांचे ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेतक-यांचे हे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतक-यांनीही घेतला असून, महाराष्ट्रातही ३ डिसेंबर रोजी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे़ राज्यातील आंदोलन तीव्र करण्यासाठी मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ६ दिवसांपासून निदर्शन देत आहेत. कृषी कायदा रद्द करा, शेतक-यांना न्याय द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अशा घोषणा शेतकरी करत आहेत. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतक-यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले चार दिवस बसले आहेत. हे आंदोलन देशातील सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करणार, असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिला आहे.

संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात ३ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रास्ता रोको करून शेतक-यांचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे शेतक-यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आपल्या अन्नदात्यांच्या या आंदोलनात राज्यातील जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी संघटना आणि समाजसेवी संघटनांचे व्यासपीठ असलेल्या जनसंघटनांची समन्वय समितीची ऑनलाईन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने संपन्न होऊन या समितीनेही ३ डिसेंबरच्या राज्यातील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

उर्मिला मातोंडकर शिवबंधनात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या