27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींच्या समर्थनार्थ राज्यभर निदर्शने

राहुल गांधींच्या समर्थनार्थ राज्यभर निदर्शने

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीने चौकशीविरोधात राज्यभरात शुक्रवार दि. १७ जून रोजी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून सर्वच जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीने चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचे देखील पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. तसेच काँग्रेसच्या आंदोलकांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, वाशिम या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

नाशिकमध्ये आंदोलन
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेधाचे फलक घेत आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापुरात सतेज पाटील यांचे धरणे
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने करण्यात येत आहे. हा गैरवापर तत्काळ थांबवावा अशी मागणी करत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळया समोर धरणे आंदोलन सुरु केले.

पुण्यात आंदोलन
काँग्रेसने जिल्हाधिकारी कर्यालयासमोर आंदोलन केलं. राहुल गांधी यांची चौकशी सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसनं केला आहे. राहुल गांधी यांनी सरकार विरोधात आवाज उठवला म्हणून कारवाई केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.

हिंगोलीत आ. सातवसह कार्यकर्ते ताब्यात
हिंगोलीतही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉग्रेसच्या आंदोलनात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. आंदोलन चिघळल्याने आंदोलकांनी काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

अहमदनगरमध्ये वाहतूक विस्कळीत
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेमध्ये पोलिस आणि आंदोलकांना बसला दे धक्का देण्याची वेळ आली. संगमनेरमध्ये आज बसस्थानकासमोर केंद्र सरकार विरोधात काँग्रेसने धरणे आंदोलन सुरु केले असताना परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडली. बराच वेळ प्रयत्न करुनही बस सुरु होवू शकली नाही. बस बंद पडल्याने नाशिक -पुणे महामार्गावर ट्राफीक जाम झाली होती.

परभणीत काँग्रेसचा रास्ता रोको
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्ग काँग्रेसच्या आंदोलकांनी अडवला होता. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

औरंगाबादेत आंदोलन
औरंगाबादेत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन सुरु केले. काँगेस पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिका-यांनी या कारवाई विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने सुरु केली आहेत. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांवर मोदी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.

चंद्रपूरमध्ये मोदींचा पुतळा जाळला
चंद्रपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

धुळ्यात धरणे आंदोलन
राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धुळ्यात शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नागपूरमध्ये पोलिस, आंदोलक आमने-सामने
काँग्रेस नेते राहुल गांधींची ईडीनं चौकशी केली आहे. या चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिस आणि आंदोलक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपविरोधी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या