20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रखोकेवरून टीका करणा-यांवर खटला

खोकेवरून टीका करणा-यांवर खटला

एकमत ऑनलाईन

शिंदे गटाचा इशारा, प्रक्रिया सुरू झाल्याची शिवतारे यांची माहिती
मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. खा. सुळे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोकेवरून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी शिवी दिली. त्यावर शिंदे गटानेही सत्तार यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, सोबतच खोक्याची भाषा करणा-या अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे या तिन्ही नेत्यांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणा-यांंविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनाही इशारा दिला.

विजय शिवतारे म्हणाले की, काल सुप्रिया सुळे असे म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते, तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी ब-याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेले आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्या वतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले दाखल केले जातील, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील, असे शिवतारे म्हणाले.

याचबरोबर खोके आणि बोके अजित पवारही म्हणत आहेत, सुप्रिया सुळेही म्हणत आहेत आणि आदित्य ठाकरेही म्हणत आहेत, या तिघांनाही नोटीसा पाठवल्या जातील. एक तर तुम्ही दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा नाही तर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा. तुम्ही जे ५० खोके घेतल्याचा आरोप करत आहात, त्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करावेत. निश्चितपणे खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट होईल, असेही यावेळी शिवतारे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या