पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मांसाहार करून मंदिरात गेल्याचा आरोप केला असून याबद्दलचे फोटो आणि व्हीडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आरोपांवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिक्रिया देताना हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सुप्रियाताईंनी शरद पवारसाहेबांकडून हिंदू धर्म शिकून घ्यावा. मंदिरात जाण्याआधी मांसाहार करू नये किंवा मांसाहार करून मंदिरात जाऊ नये असे आनंद दवे यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, शरद पवारसाहेबांनी पाळलेली ही तत्वे सुप्रियाताईंनी सुद्धा पाळायला हवी होती. इतका पुरोगामीपणा निदान जाहीरपणे करणं बरं नव्हे, सुप्रियाताई!, असं आनंद दवे यांनी म्हटले आहे. शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले आहेत. मटण खाऊन मंदिरात जात देवदर्शन केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. त्यावरून आनंद दवे यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
शिवतारे काय बोलले माहिती नाही : सुळे
विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर माझ्या वाचनात अजून काही आले नाही. संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी बघत आहे त्यामुळे ते काय बोलले मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.