मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना लवकरच समन्स पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. नूपूर शर्मा यांना समन्स पाठवून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे, असे पांडे म्हणाले.
नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपर्ू्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर भाजपने नूपूर शर्माचे प्राथमिक सदस्यत्त्व रद्द केले आहे. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. रझा अकादमीने मुंबई पोलिसांकडे नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
नुपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेटमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. शर्मा यांच्या वक्तव्याने गदारोळ झाला होता. नॅशनल कॉन्फरन्ससह विविध मुस्लिम संघटनांकडूनदेखील नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. रझा अकादमीनें मुंबई पोलिस आयुक्तांना नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले होेते. मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पुणे पोलिसांनी देखील नूपूर शर्मा यांच्याविरोधातील तक्रार नोंदवून घेतली आहे.
नुपूर शर्मा भाजपमधून निलंबित
नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भातील वक्तव्यानंतर सुरु झालेल्या वादाला शांत करण्यासाठी भाजपकडून रविवारी पत्रक जारी करुन आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. कोणत्याही धर्मातील महामानवासंदर्भातील अपमानास्पद वक्तव्य स्वीकारले जाणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते.