अमरावती : मुंबईत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. उदयपूरच्या धर्तीवर अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या आयुक्तांच्या अपयशामुळे झाल्याचे पत्र त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे.
अमरावतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की केमिस्ट उमेश यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर टिप्पणी केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हत्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यानं कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आता हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला असून या तपासातून काय बाहेर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.