28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रपात्र उमेदवारांना तात्काळ सेवेत घ्या - छत्रपती संभाजीराजे

पात्र उमेदवारांना तात्काळ सेवेत घ्या – छत्रपती संभाजीराजे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्यांतर्गत २०१८ सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे २१८५ मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. प्रथमत: कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली टाळेबंदी व नंतर सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती, या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्र देण्यास विलंब झाला, असे संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द करताना दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, पात्र पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरित शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

ई. डब्ल्यू. एस. प्रवर्ग निवडण्याचा पर्याय द्या
दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी व नंतर सुरू झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियांमध्ये सहभागी झालेल्या मराठा उमेदवारांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकामधील कलम ३ मधील उपकलमांमुळे प्रवर्ग निवडण्याबाबत संभ्रम होता. यामुळे सदर प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस. ई. बी. सी. व ओपन प्रवर्ग निवडला आहे, अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ई. डब्ल्यू. एस. प्रवर्ग निवडण्याचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून द्यावा, असेही म्हटले आहे.

श्री केशवराज इंटरनॅशनल सीबीएससी स्कुलच्या बेकायदाशीर बांधकामास स्थगिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या