सातारा : महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेला आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने चांगलीच नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे.
किल्ल्याची तटबंदी, काही बुरूज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. संततधार पावसाने पन्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजाला लागून असलेल्या ऐतिहासिक भिंतीचा काही भाग सायंकाळी कोसळला आहे. मागीलवर्षीही याच जागेजवळ भिंतीचा काही भाग कोसळला होता, मात्र निधीअभावी दुरुस्तीची कामे झाली नाहीत.
काय म्हटले आहे पत्रात?
कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागत आहे, या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थही दिवसरात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरूज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे असे चित्र दिसते.