24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeमहाराष्ट्रतळीये गाव ढिगा-याखाली

तळीये गाव ढिगा-याखाली

एकमत ऑनलाईन

रायगड : अतिवृष्टीने कोकणातील तळीये गावात होत्याचे नव्हते करून टाकले. गुरुवारी सायंकाळी तळीये गावावरच दरड कोसळली. येथील ४२ पैकी तब्बल ३२ घरे दगड-मातीच्या ढिगा-याने गिळंकृत केली. अचानक ओढवलेल्या या संकटाने तळीये गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. सध्या येथे मदत व बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफचे जवान ढिगा-याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तळीये गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू; सर्वांना मदत दिली जाईल. काळजी करू नका, अशी ग्वाही शोकग्रस्त नागरिकांना दिली.

तळीये गावात अद्याप बचावकार्य सुरूच आहे. ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ६० जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२४ जुलै) दुपारी तळीये गावाला भेट दिली. मुंबईहून दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री तळीयेसाठी रवाना झाले. त्यानंतर साधारण दीड ते दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दु:खात बुडालेल्या तळीयेवासियांचे सांत्वन करत धीर दिला.

मुख्यमंत्री घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी दुर्घटना आणि मदत कार्याबद्दल माहिती दिली. माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी हातात छत्री धरून स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचे सांत्वन केले. आजकाल पावसाची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगरउतार व कडेकपा-यातील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवत आहे. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जल आराखडा तयार करणार असल्याचे स्पष्ट केले.

खेड पोसरे येथे १७ मृतदेह सापडले
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या १७ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे. यामध्ये ७ घर दरडीखाली गाडली गेली होती. अजून शोध कार्य सुरू आहे. यामध्ये ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आंबा घाटात देखील दरड कोसळली
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटमार्गे वाहतूक थांबली आहे. या भागात पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली आहे.

म्हाडा करणार तळीयेचे पुनर्वसन
महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरे दगड मातीच्या ढिगा-याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच जीवितहानी झाली आहे. आता हे गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली.

राज्यात ९ जिल्हे अतिवृष्टीने बाधित
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ९ जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली असून, अनेकांचे अख्खे कुटुंबच मातीच्या ढिगा-याखाली गडप झाले आहे. दरड आणि पूरग्रस्तांना सध्या एनडीआरएफचे ३१, तर वायूदलाची १४ पथके कार्यरत पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नवाटप केले जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात ५७ रस्ते पाण्याखाली
सांगली जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस व धरणांमधून करण्यात येत असलेला विसर्ग यामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे २४ जुलैपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व कडेगाव तालुक्यांमधील ५७ रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

सातारा जिल्ह्यात ३७९ गावे
बाधित, १८ जणांचा बळी
अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली, तर १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता, ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पूर्णत: व २१२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.

कोल्हापूरला पुराचा वेढा
कोल्हापुरात चार दिवसांनंतर शनिवारी सूर्यदर्शन झाले. मात्र, शहराला पुराचा वेढा कायम आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. काल दिवसभरात ४१ हजार लोकांचे स्थलांतर केले. दरम्यान, कोल्हापुरात ११६ बंधारे पाण्याखाली गेल्याने मोठी हानी झाली आहे.

देशात ४० ठिकाणी सीबीआयचे छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या