37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा देऊळ बंद?

राज्यात पुन्हा देऊळ बंद?

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही भर पडत असल्याने राज्य सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी पुढील आठ दिवसांत लोकांकडून योग्य प्रतिसाद आला नाही तर आठ दिवसांनंतर लॉकडाऊन घोषित करणार असल्याचे सांगितले. तसेच राजकीय सभा, मेळावे, राजकीय मिरवणुका, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाच्या मिरवणुका आणि यात्रा, जत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देवस्थाने पुन्हा एकदा बंद होतील अशा चर्चा सु्रू आहेत. राज्यातील अमरावती, नाशिक, अचलपूर, नागपूर, जळगाव, यवतमाळ, धुळे, औरंगाबाद व आता सोलापूर जिल्ह्यातही नाईट कर्फ्यू आणि निर्बंध जाहीर झाले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ‘देऊळ बंद’ करण्याचा निर्णय अनेक देवस्थानांनी घेतला आहे. तर काही ठिकाणी मंदिराच्या वेळेत बदल केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात दर्शन वेळेत आता बदल करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-पास,अभिषेक बंद करण्यात आले असून सोशल डिस्टन्ससह सॅनिटायझर हातावर घेऊन दर्शनाला सोडले जाईल. तसेच मंदिर परिसरात फोटो काढताना आढळल्यास संबंधितांचे मोबाईल फोन जप्त करण्यात येणार असल्याचे प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्चपासून श्रीअंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी भाविकांना दर्शनासाठी काही नियमावली घालून मंदिर खुले करण्यात आले होते. सध्या कोरोना संसर्ग पाहता, प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने खबरदारी म्हणून दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार दि. २५ फेब्रुवारी २०२१ पासून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे
मंदिराच्या पूर्व व पश्चिम दरवाजातून दर्शन सुरू राहणार असून, पूर्व दरवाजाकडील मंडप तसेच मुख दर्शनास येणाºया भाविकांना रांगेत सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक मार्किंग करण्यात येणार आहे.

साई भक्तांना दर्शनासाठी नियमात बदल
शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले आहेत. आता सकाळी ६ ते रात्री ९ या काळातच साई भक्तांना दर्शन घेता येणार असून रात्री ९ ते सकाळी ६ अशा ९ तासांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. अहमदनगर जिल्हाधिकाºयांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केल्यामुळे शिर्डी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तांसाठी बंद असेल, गुरुवारची पालखी देखील बंद असेल, गुरुवार-शनिवार-रविवार आणि उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रिक पास काऊंटर बंद ठेवण्यात येईल, अशा काही नियमांचा समावेश आहे.

शेगावचे गजानन महाराज मंदिर बंद
अमरावती विभागीय आयुक्त तसेच बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत शेगावचे गजानन महाराज मंदिर बंद राहणार आहे़

पंढरपूरची माघी यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची यंदाची माघी यात्राही रद्द करण्यात आली़ माघी एकादशी दिवशी मंदिर बंद होते़

चौरागडची महादेवाची यात्रा रद्द
सातपुडा पर्वतरांगांच्या सर्वांत उंच टोकावर भरणारी महादेवाची यात्रा यंदा स्थगित करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पंचमढी येथील चौरागडावर महाशिवरात्रीला दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांची यात्रेला मोठी गर्दी असते. मात्र यंदा महाराष्ट्रात वाढत असलेले कोरोना संक्रमण आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता यात्रा रद्द केली आहे.

माहूरगडावरील दत्तशिखर व अनुसया मंदिर भाविकांसाठी बंद
त्रिमूर्ती अवतार दत्तप्रभूंचे जन्मस्थान असलेल्या दत्तशिखर गडावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून श्रीक्षेत्र माहूर गडावरील दत्त मंदिर व अनुसया मंदिर दिनांक २२ फेबु्रवारीपासून भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

१० महिने मंदिरे पूर्णपणे बंद होती
२०२० मध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्यातील मंदिरे, धार्मिक कार्यक्रम १० महिने पूर्णपणे बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वेग मंदावत असताना महाविकास आघाडी सरकारवर मंदिरे खुली करण्यासाठी विरोधकांकडून दबाव टाकला जात होता. तसेच धार्मिक संघटनांकडूनही मंदिरे खुली करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानंतर राज्यात मंदिरे खुली झाली. मात्र मंदिरे खुली होऊन २ महिने उलटत नाहीत तोवर रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे, त्यामुळे राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात ५५ जण कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या