नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना सुखकर प्रवास दणा-या रिक्षा आता नव रूप घेणार असून लवकरच या रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर केले जाणार आहे. नाशिक मनपाने शहरात ई रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशासह राज्यात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार नाशिक महानगरपालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आखली आहे. त्यानुसार शहरात ई रिक्षा रस्त्यावर आणण्यासाठी संदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
नाशिक शहरात अनेक पर्यटनस्थळ असल्याने भाविकांची गर्दी असते. त्यामुळे अनेकदा सार्वजनिक वाहतुकीची साधने कमी पडतात.
अशावेळी रिक्षाचा वापर केला जातो. मात्र अलीकडच्या काळात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेला ईव्ही प्रमोशन प्लॅन अंतर्गत पुढील पाच वर्षांत राज्य सरकारकडून एकूण १२४ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यासाठी राज्य सरकारकडून पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी २४ कोटी रुपये अनुदान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक मनपाने तयार केलेला अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेने दहा हजार पेट्रोल/डिझेल-आधारित ऑटो रिक्षा ई-रिक्षात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
१०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन
येत्या पाच वर्षांत दहा हजार ऑटोरिक्षांचे ई-रिक्षात रूपांतर करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च करणार आहोत. याशिवाय, नाशिक महानगर पालिका या इ रिक्षांच्या चार्जिंगसाठी शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. संबंधित चार्जिंग ठिकाणांची पाहणी देखील मनपा अधिका-यांनी केली आहे.