मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तांतर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिवसेनेला ठाण्यात आणखी एक जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी एक ट्वीट करत एक सूचक इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्वीटनुसार आगामी काळात होऊ घातलेली ठाणे महापालिका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवणार असल्याची चर्चांना या ट्वीटनंतर उधाण आले आहे.
सध्या एकनाथ शिंदेंसह साधारण ४२ आमदार गुवाहटी येथे आहेत. अनेक आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. तर, शिंदेंनी आमची शिवसेवा खरी असल्याचा दावा केला आहे. त्यात काल मुख्यमंत्र्यांनी सरकारी निवास्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार असल्याचा चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
त्यात आता ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी ट्वीट करत आम्ही तुमच्यासोबत…….आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना असं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेली महापालिका निवडणूक शिंदे यांच्या नेत्तृत्त्वाखाली लढवली जाणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या असून, असे झाल्यास सत्तांतरानंतर शिवसेना बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानावा लागेल.