24 तासात झालेल्या या 3 हत्येच्या घटनांनी नागपूर पोलिसांच्याही चिंतेत वाढ

324

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत लॉकडाऊनमध्ये थांबलेल्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे नागपुरात 24 तासात (3 ते 4 जून) 3 हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 24 तासात झालेल्या या 3 हत्येच्या घटनांनी नागपूर पोलिसांच्याही चिंतेत वाढ केली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

खुनाची पहिली घटना नागपूरमध्ये यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत बुधवारी (3 जून) रात्री घडली. अनुज बघेल असं मृताचं नाव आहे. बघेल काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तो तुरुंगामध्ये जाण्यापूर्वी त्याने आरोपीची गाडी जाळली होती. तो तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर आरोपीने आपल्या गाडीच्या नुकसानीबद्दल बघेल याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, मृतकाने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यातून आरोपीने बघेलची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Read More  पुन्हा रंगणार क्रिकेटचा थरार!५०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार टी-२० स्पर्धा

खुनाची दुसरी घटना नागपूरच्या गोपालनगर परिसरात घडली. 24 वर्षीय कार्तिक साळवी हा बाईकवरुन जात असताना मागून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी कार्तिक साळवे याच्या डोक्यावर घातक शस्त्राने वार केला. या हल्ल्यातच कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. कार्तिक हा केबल ऑपरेटर म्हणून काम करायचा. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचं सांगितलं जात आहे. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हत्येची ही घटना चित्रित झाली आहे. प्रतापनागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी एस खनदाले यांनी याबाबत माहिती दिली.

खुनाची तिसरी घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. वैभव मूर्ते असं मृत तरुणाचं नाव आहे. लॉकडाऊन दरम्यान नागपुरातील गुन्हेगारी थोडी थंडावली होती. लॉकडाऊन शिथिल होताच आता गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले की काय असं चित्र तयार झालं आहे. गेल्या आठवडाभरात नागपूर शहरातच खुनाच्या 6 घटनांनी नागपूर पोलिसांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे.